Bapu…

बापू तुमच्या देशाला झालंय तरी काय?

( आनंद कुलकर्णी )

खाटिकखान्यात पोचली- गोठ्यामधली गाय
वृद्धाश्रमात पोचली- जन्मदात्री माय
माणसांच्या या गर्दीत आता
माणुसकीचं नावसुद्धा गावलं नाय
– बापू…

तुम्ही म्हणालात, हिंदू-मुस्लिम भाई भाई
राम-रहीम वेगळे नाही
इथं तर सख्खा भाऊ- भावाच्या जिवावर उठलाय
एक आहे उभा- दुसऱ्याच्या छातीवर देऊन पाय
– बापू…

तुम्ही म्हणालात- विसरा जाती- एक व्हा
भेदभाव विसरून- आता सारे- नेक व्हा
जातीपाती बरोबर- पक्षोपक्षांचाही दरारा वाढलाय
कोण आपला कोण परका- काही कळतच नाय
– बापू…

तुम्ही म्हणालात, खेड्याकडे वळा, तिथेच भारत वसला आहे
राजकारणानं खेडी सारी नासली, तुमचा प्रयोग फसला आहे
माणसांच्या झुंडीनी शहरांची झाली झोपडपट्टी
पाय ठेवायलाही तिथं जागा आता उरली नाय
– बापू…

मोठमोठ्ठाली आम्ही धरणं बांधली
बघता बघता ती गाळानं भरली
नद्यांचं रूप गटारासारखं झालंय
बळिराजाच्या नशिबी बिनपाण्याचं मरणच हाय
– बापू…

सत्याचे प्रयोग करून तुम्ही खाल्ली गोळी
सत्तेच्या तव्यावर असत्याचे प्रयोग करून
पुढारी भाजून घेतोय आपली पोळी
सत्त्याकडून गुत्त्याकडे- त्याचे वळलेत आता पाय
– बापू…

तुम्ही म्हणालात, देशापूर्वी माझ्या देहाचे तुकडे पडतील
तुम्ही संपलात अन्‌ देशही दुभंगला
उरलासुरला देश सेझच्या नावाखाली आम्ही विकाया काढलाय
कोण बरोबर… कोण चूक… काहीच आता उमजत नाय
– बापू…

डान्स क्‍लब, बिअरबार – तरुणाई सारी तिकडेच जाणार
दूध तुमच्या शेळीचं – “चिअर्स’ म्हणत चवीचवीनं कोण पिणार
हाय- हॅलोचा बघा जमाना आलाय
आई झाली मम्मी – अन्‌ बाप डॅडी हाय-फाय
– बापू…

अहिंसेचे तुमच्या- कधीच वाजलेत बारा
दिवसाढवळ्या गुंड फिरतात- हाती घेऊन सुरा
तुमच्या चरख्याचं फिरणं- पार आता थांबलंय
कॉम्प्युटरशिवाय कुणाचं- डोकंच आता चालत नाय
– बापू…

तुम्ही तुमचा “आतला आवाज’ ऐकत होतात
त्यानुसार निर्णय घेत होतात
ध्वनिप्रदूषण आता इतकं झालंय
आम्हाला आमचा आतला काय, बाहेरचासुद्धा आवाज ऐकू येत नाय
– बापू…

बापू इथला पैसेवाला – देवालाही लाखालाखाची लाच देतोय
मंदिर अडवून पोराबाळांसाठी तासन्‌ तास प्रार्थना करतोय
तुमचा हरिजन मात्र आजही केवळ एका एन्ट्रीसाठी उर फुटस्तो –
टाहो फोडतोय
सांगा तुमचा हरी- बहिरा झाला काय?
– बापू…

बापू तुम्हाला जमेल तेव्हा एकदा खाली येऊन जा
तुमच्या स्वप्नातला भारत तो “हाच का?’
तेवढं बरीक बघून जा
– बापू…

खरं सांगतो – बापू तुम्हाला तुमच्याशी खोटं बोलवत नाही
जिताजागता जिवंत महात्मा आम्हाला मुळीसुद्धा परवडत नाही
– बापू…

“महात्मा’ – हुतात्मा झाल्याशिवाय
त्याचं मोठेपण आम्हाला भावत नाही
मस्तक कसं भणाणून गेलंय बापू
या पुढं हे असंच चालणार काय?
एकदा येऊन सांगून जा
या देशाला झालंय तरी काय?
झालंय तरी काय?
झालंय तरी काय?

– आनंद कुलकर्णी

Advertisements
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: